आम्ही राजीव दीक्षित यांच्या स्वदेशी विचारांनी प्रेरित होऊन, “फक्त स्वदेशी नीतीमुळेच हिंदुस्थान पुन्हा सुवर्ण गरुड बनू शकतो” या विश्वासाने कार्य करतो. भाषा, भूषा, भेषज, भोजन, भजन, भवन, भाव तसेच गोसेवा, नैसर्गिक शेती, योग, आयुर्वेद, स्वदेशी शिक्षण आदी क्षेत्रात खालील ध्येयांद्वारे आम्ही भारताला आत्मनिर्भर, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
- स्वदेशी प्रशासन-ग्राम स्वराज: सध्याची सरकारी प्रशासन व्यवस्था पाश्चात्य पद्धतीवर आधारित (ब्रिटिश मॉडेल) आहे, गावाचा निर्णय महानगरातून, महानगराचा निर्णय मुंबई-दिल्लीतून होतो. गावातल्या लोकांना काही अधिकार नाहीत, गावे परावलंबी झाली आहेत. म्हणून ग्राम स्वराज्य– गावाला पूर्ण स्वायत्तता (गांधीजींचे स्वप्न) आणणे. गावे स्वावलंबी व स्वयंपूर्ण करणे.
- गोसेवा आणि पर्यावरण संरक्षण: गोसेवाद्वारे देशी गायींचे संरक्षण आणि आरोग्यासाठी पंचगव्य-आधारित उत्पादनांचा प्रसार करणे. यात भेषज (गोमूत्र-आधारित औषधे) आणि नैसर्गिक शेतीसाठी गो-उत्पादनांचा- गोमुत्र, गोमयचा वापर समाविष्ट आहे.
- स्वदेशी उत्पादनांचा प्रचार: भारतीय बनावटीच्या वस्तूंना, भूषा (जसे खादी, हातमाग) आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंना प्रोत्साहन देणे, जेणेकरून परदेशी उत्पादनांवरील अवलंबन कमी होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल.
- स्वदेशी शिक्षण आणि भाषेचा प्रसार: गुरुकुल शिक्षणास प्रोत्साहन देणे. स्वदेशी पाठ्यपुस्तके, मातृभाषेत सर्व शिक्षण झाले पाहिजे (जसे मराठी, हिंदी, संस्कृत, तमिळ, गुजराती,बंगाली राज्यानुसार) यांचा प्रचार करणे, जेणेकरून विद्यार्थ्याला शिकणे व ज्ञान घेणे सोपे आणि आनंददायी वाटेल.आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडता येईल, ते सुसंस्कृत नागरिक बनतील.
- स्वदेशी आरोग्य व्यवस्था: घातक असलेली आलोपथी टाळून पूर्वजांनी विकसित केलेल्या उपचार पद्धती, आयुर्वेद आणि परंपरागत भारतीय चिकित्सा पद्धतींचा प्रसार करणे, ज्यात पंचगव्य, निसर्ग आधारित औषधे, योग आणि जीवनशैली सुधारणांचा समावेश आहे, जेणेकरून रोगमुक्त समाज निर्माण होईल.
- स्वदेशी नैसर्गिक शेती: रासायनिक शेती व हरितक्रांती यांचे मानवी आरोग्यावर, समाजावर व अर्थव्यवस्थेवर झालेले घातक परिणाम शेतकरी व जनतेला समजावून सांगून देशी गायीवर आधारित नैसर्गिक शेती करण्यास व उत्पादने घेण्यास प्रेरित करणे.
- स्वदेशी भोजन: भोजन म्हणून सेंद्रिय आणि परंपरागत भारतीय अन्नपदार्थ (जसे बाजरी, ज्वारी, स्थानिक धान्य, फळे, पालेभाज्या) यांना प्राधान्य देणे आणि परदेशी संस्कृतीत्तून आलेल्या, प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी आयुर्वेद-आधारित आहार पद्धतींचा प्रचार करणे.
- राष्ट्रीय भाव आणि स्वदेशी संस्कृती: भाव म्हणजेच राष्ट्रीय अभिमान आणि स्वदेशी चळवळीच्या विचारांना प्रोत्साहन देणे. ऋषी-मुनींनी विकसित केलेली संस्कृती, भारताचा स्वर्णिम इतिहास, थोर परंपरा आणि स्वदेशी नायकांच्या कथा सांगून करून नव्या पिढीत स्वदेशी भाव जागृत करणे.
- योग आणि वैदिक ज्ञान: योग, ध्यान आणि वैदिक विज्ञानाचा प्रसार करून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य वाढवणे. यात नैसर्गिक जीवनशैली आणि योग, प्राणायाम यांचा समावेश आहे.
- भजन आणि आध्यात्मिक जागृती: भजनद्वारे भारतीय भक्ती परंपरा आणि आध्यात्मिक संगीताचा प्रसार करणे, जेणेकरून लोकांमध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जोड निर्माण होईल. यात स्थानिक आणि परंपरागत भक्तीगीते आणि कीर्तनांना प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.
- स्वदेशी भवनांचे निर्माण: भवन: स्वदेशी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रांची स्थापना. आपली घरे जसे आपले पूर्वज राहत होते तसे माती, लाकूड, आणि स्थानिक साधनांनी बांधलेले घर, जे पर्यावरणाशी सुसंगत आहे. तसेच स्थानिक स्तरावर स्वदेशी भवन (मंच) तयार करणे समाविष्ट आहे.
- परदेशी शोषणाविरुद्ध जागरूकता: बहुराष्ट्रीय कंपन्यां भारतातून शब्दशः अब्जावधी रुपये देशातून बाहेर नेतात. त्या आर्थिक शोषणाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे आणि भूषा (खादी), भोजन (पारंपारिक पण फक्त आरोग्यदायी पदार्थ, सेंद्रिय अन्न), भेषज (पारंपारिक व आयुर्वेदिक औषधे) यासारखे स्वदेशी पर्याय निवडण्यासाठी प्रेरित करणे.
.🍀